तुझं येणं
सहज, संथ अन सस्मित ;
ऋतुंच्या बहरातल्या कोमलतेसम,
अर्धोन्मिलित कळ्यांच्या
पाकळ्यांवर पडणाऱ्या
धवलसवितृ रेशमी पायघड्यांवरून
तुझं येणं....
अकस्मात, अधीर अन अस्थिर
मेघमालेच्या पिंजलेल्या कापशीतून,
जालधारेच्या तालबध्द धारानृत्यास
तेजोमय वृन्दवाद्यरूप
विद्युल्लतेच्या प्रकाशवाटेवरून
तुझं येणं
शांत, शीतल अन शुभंकर ;
वैशाख वणवणीच्या होरापळीतून
रणरणत्या वाळवंटातून
मरूस्थलछायेत विसावणाऱ्या
वायुलहरींच्या सुखाद्संवादातून
तुझं येणं ...
तुझं येणं ,
मग माझं गाणं
आणि मग
ते गाणंच
माझं जगणं.
अभिनव.
Comments